सिंहस्थ कुंभ २०२७ पूर्वी नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करुया !
सिंहस्थ कुंभ २०२७ पूर्वी नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करुया ! नाशिक, २९ डिसेंबर :- आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर स्वच्छता व स्वच्छ जीवनशैलीचा आदर्श ठरावे, या उद्देशाने नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, नागरिकांचा सहभाग तसेच गोदावरी नदी काठ परिसर व आसपासच्या परिसरातील स्वच्छता या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आयुक्त खत्री यांनी स्वच्छता ही केवळ मोहिम न राहता नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग व्हावी, यावर भर दिला. यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था, शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांनी एकत्रितपणे काम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक प्लॉगर्स, हरित कुंभ, गोदावरी आणि AI LSG यांसारख्या संस्थांच्या प्रतिनिधींनी विभागनिहाय ब्लॅक स्पॉट्स ओळखणे, कचरा वर्गीकरण, जनजागृती, स्पर्धा, प्रदर्शने, नागरिकांकडून स्वच्छतेची शपथ घेणे आणि सामूहिक सहभाग वाढवणे अशा उपक्रमांची सूचना मांडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर देखील उपस्थित होत्या. मनपा आयुक्त खत्री यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने विभागनिहाय स्वच्छतेच्या समस्या ठरावीक कालावधीत सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच कचरा टाकण्याबाबतच्या तक्रार निवारण यंत्रणेला अधिक प्रभावी करण्यावर भर दिला. कचरा वर्गीकरण व शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन केल्याशिवाय स्वच्छ शहर शक्य नाही, असे नमूद करत नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे उद्दिष्ट साध्य होणार नाही, असे मनपा आयुक्तांनी सांगितले. सर्व स्वयंसेवी संस्था व नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभ २०२७ हे केवळ एक धार्मिक आयोजन नसून नाशिक शहराची स्वच्छ, शिस्तबद्ध व सक्षम ओळख देशासमोर मांडण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली तर नाशिक शहर राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात स्वच्छ शहर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Tell Us Your Opinion We value your perspective! Share your thoughts, feedback, or questions below. Your opinion matters and helps create a richer, more engaging conversation. Let’s connect and hear what you think about this post!
सिंहस्थ कुंभ २०२७ पूर्वी नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करुया ! Read More »
